पुरंदर रिपोर्टर Live
जेजुरी, पुणे | प्रतिनिधि
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र जेजुरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे साडेचार लाख रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही चोरी कऱ्हा नदीवरील नाझरे धरणाच्या पात्रात शुक्रवारी (06 जून) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
काय घडलं नेमकं?
बाबासाहेब लक्ष्मण भुकन (रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) हे आपल्या कुटुंबासह खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आले होते. पवित्र मानल्या जाणाऱ्या कऱ्हा नदीत स्नानासाठी ते जेजुरीपासून अवघ्या ३ किमी अंतरावरील नाझरे धरणाच्या ठिकाणी गेले.
तिथे गाडी उभी करून सर्व कुटुंबीय नदीत स्नानासाठी उतरले. अंघोळीच्या आधी भुकन यांनी कुटुंबातील महिलांचे सोन्याचे दागिने काढून स्वतःच्या पॅन्टमध्ये ठेवले आणि ती पॅन्ट मुलाला सांभाळायला सांगितली. मात्र तो मुलगाही अंघोळीसाठी खाली उतरल्यामुळे त्या पॅन्टवर लक्ष राहिले नाही.
जेव्हा सर्वजण परतले, तेव्हा पॅन्टच गायब होती आणि त्यात ठेवलेले सर्व 11 तोळे सोन्याचे दागिने कुठेच सापडले नाहीत. अज्ञात चोरट्याने संधी साधून संपूर्ण दागिने लंपास केले.
या प्रकरणी बाबासाहेब भुकन यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,गुन्हा रजिस्टर नंबर 203/2025 नुसार IPC 2023 चे कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार मुजावर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांकडून नाझरे धरण परिसरातील CCTV फुटेज, स्थानिक लोकांची चौकशी आणि वाहनांची तपासणी सुरू आहे.

0 Comments